Tuesday, 1 April 2014

देव एकला…!!!

वात विझत चालली होती
दिवा निजत चालला होता 
मूर्ती फिकटत गेली होती 
पार ओसरत चालला होता 

घंटा स्तब्ध टांगली होती 
टाळ निपचित पडली होती
मुक्या तारा वीणेच्या होत्या 
शांतता व्यापात चालली होती 

वाट सुनी उरली होती 
द्वारे सताड उघडी होती 
झाड अंधारी दडले होते 
फुलं निर्माल्य बनली होती 

आता शेंदूर काळोखला होता 
गाव आपल्यात रंगलं होतं 
कळस पुसटत गेला होता
सांज ढळत चालली होती 
 
रात्र गडद झाली होती 
चांदणं मिणमिणतं राहिलं होतं 
देव एकटाच उरला होता 
आणि देऊळ रिकामं राहिलं होतं 

- Oms 
०१/०४/२०१४
११:५५ मि.



 

No comments:

Post a Comment