Friday, 31 January 2014

शोध मनाचा … !!!

कुठे शोधतोय मनाला , असेल कुठल्याश्या तीरावरती
सांजसुरांवर रेंगाळलेलं , किंवा तरंगांच्या अवती भवती

असावं इंद्रधनुच्या रंगी , वा उंच रुक्ष पठारावरती
वाहत असावं झऱ्यात छोट्या , वा दवाने भिजल्या तृणांवरती 

बरसत असेल पावसासंगे , किंवा दाटलं असावं मळभासंगती
पांघरूण बनलं असेल धुक्याचं , या हिरव्या पाचूश्या धरतीवरती

असेल कदाचित देवळामध्ये , वा हरवलं असावं पायरीवरतीच
गुंग असावं पैंजणांच्या नादात , वा असावं माळलेल्या गजऱ्याभोवती

हुडकावे या मनास कुठे , जिथे असतील फक्त आपली नाती
मग चार थेंबही पुरे पडती , हे ओघळणारे या गालांवरती ….

- Oms
०१/०२/२०१४
०२:०२ मि.

Tuesday, 28 January 2014

तुझा मी… !!!

थेंबांसवे पावसाच्या बरसणे आज होत आहे 
वाऱ्याच्या बासरीवर जणू जुन्या सुरांचे गीत आहे 
पावसाचा खेळ सारा तू सुखे पहात आहे 
दवबिंदू मी जसा, अन तू अशी तृणात आहे



 

कवितेतला हर एक शब्द मनाची सावलीच आहे 
पकडू मी पाहतो तिला परी ती तुझ्या आसपास आहे 
अनोळखीसे शद्ब सगळे जरी गीत हे जुनेच आहे
जणू सजलेली मैफिल मी, अन दाद ती तुलाच आहे

 

दिसतो जुनाच चंद्र अन आकाश हे जुनेच आहे 
कुठलासा एक तारा तू मी उरलेला काळोख आहे
धुक्याच्या पुंजक्यास माझ्या भावनांचा स्पर्श आहे
गुलाबिशी रात्र मी, तू कोवळ्या चांदण्यात आहे

- Oms 
२८/०१/२०१४
२३:५६ मि. 

Monday, 27 January 2014

नाते बांधलेले … !!!

कुणाचे कुणासवे नाते 
कुणीतरी कसे हे बांधले 
कधी तर ऊब स्पर्शाची 
अन कुठे रेशमी शहारे

मनाला चांदण्यामध्ये 
दिसती किती इशारे 
कुणा तो ठिपका आपुला वाटे 
कुणा ते परकेसे नजारे 

कधी शब्दांची गिचमिड 
कुणा ते बोल त्या मनाचे 
कुणी जपतात चार ओळ्या 
कधी उणे गीत हे सुरांचे 

कुणा या नात्यांचा बंध 
तर कुठे बांधलेली नाती 
कुणी खुडती उमलले फुल
तर कुणी पाकळ्या जपती 

कसे कोडे सोडवावे  
हे मनाला पडलेले 
का नात्यांत कुठे दुरावा 
अन कुठे अनुबंध जोडलेले ???

- Oms 
२७/०१/२०१३
२१:४७ मि.





Wednesday, 22 January 2014

तुझी गझल…!!!

मन हे माझे जसे, तुझे बंदिवान आहे
तुझ्या मनामध्येच माझा, अन बंदिवास आहे

इथे स्पर्शासही मनाचा, अबोल आभास आहे
बोलक्या श्वासांसवे हे, मन तरी उदास आहे 

मनाच्या या आरशातील, चेहरा तुझाच आहे
शोधतोय मी मला परी , नजर तुझ्या डोळ्यात आहे 

मनाचा मनासवे जणू, चालला हा खेळ आहे
हरलोय त्यात मी कधीच, अन जिंकले तुलाच आहे

- Oms
२२/०१/२०१४
२२:२९ मि.   

Monday, 20 January 2014

श्लोक गुरुनाथांचे !!!

प्रसादे जसा अवतरे तोचि दत्त
सीता - राम पोटी असा तोचि सूत
जगा कष्टे सन्मार्ग दाखवितसे जो    
गुरुनाथ चरणी सदा मी नमितो ।।१।।

शिशूची तुझी रे अशी ही अवस्था
मातृ-पितृ छाया शिरा असे सदा
नित्य दत्तभक्ति या ध्यासे जगे जो
गुरुनाथ चरणी सदा मी नमितो  ।।२।। 

तुवा बापूराजासी प्रभू मानियेले
तया आदेशे भगवे परिधान केले
गुरुआज्ञा निस्वार्थे पाळीतसे जो
गुरुनाथ चरणी सदा मी नमितो  ।।३।।

अनुष्ठान गायत्री आरंभ केले
गुरु-इच्छेसी पूर्णत्वास नेले
गुरु-प्राणज्योती धारितसे जो
गुरुनाथ चरणी सदा मी नमितो  ।।४।।

पारायणे याग कित्येक केले
धरा-भास्करे ना तुला बाधीयेले
दु:खे जगाची नित्य भोगी सुखे जो
गुरुनाथ चरणी सदा मी नमितो  ।।५।।  
 
चमत्कार ना ना सदा दावियेले
परी "कर्म हा धर्म" सदा बोधियेले
नित्य दंडवत व्रत आचरितसे जो
गुरुनाथ चरणी सदा मी नमितो  ।।६।। 

विभुती जयाची ही संजीवनीच
भागीरथीही जसा अमृतार्क
मना बोधे मनोबोध-भजनांसावे जो
गुरुनाथ चरणी सदा मी नमितो  ।।७।।

"गुरुनाथ" या चार अक्षरांत वास
त्यजुनि सगुणा धारिले निर्गुणास
नित्य आपुला श्वास जाणितसे जो
गुरुनाथ चरणी सदा मी नमितो  ।।८।।

वर्णावया शब्द पडतात खुजे
तयावाचुनि नाही सर्वस्व दुजे
सदा माऊली बनुनी सांभाळीतो जो
गुरुनाथ चरणी सदा मी नमितो  ।।९।।


- २१/०१/२०१४
रा, ०२:१६ मि.


Friday, 17 January 2014

विटेवरी उभा आहे अनाथांचा नाथ !!!

सुखे नांदे पंढरी ही भीमा वाहे संथ
विटेवरी उभा आहे अनाथांचा नाथ ।।धृ।।

येथे नाही दुजा भाव नाही थोर सान कोणी
पाय लागताच येथे विसरतात दु:खे जुनी
भक्तीभावासाठी देई उद्धाराचा हात 
विटेवरी उभा आहे अनाथांचा नाथ ।।१।।

चरणाशी पुंडलिक हृदयाशी ज्ञानाई ही
मनामाझी तुकोबा अन जनाईची ही माऊली
संतांच्या या नावा येई त्याचाच सुगंध
विटेवरी उभा आहे अनाथांचा नाथ ।।२।।

ताल मृदुंगाच्या बोली नाचे माझी विठामाई
मंत्र अमृतासारिखा हाचि "विट्ठल रखुमाई"
सदा तुझी भक्ती व्हावी मागणे हे आर्त
विटेवरी उभा आहे अनाथांचा नाथ ।।३।।

-Oms
१८/०१/२०१४
१२:५५ मि.

आज मला काहीतरी लिहावसं वाटलं !

आज मला काहीतरी लिहावसं वाटलं ….
का…  माहित नाही
कसं… माहित नाही
कुठे… माहित नाही
कुणासाठी… माहित नाही
पण… आज मला काहीतरी लिहावसं वाटलं !

कुठलासा पडद्या आडला चेहरा 
समोर आणावासा वाटला 
कुठलेसे हासुत दडलेले आसू 
हलकेच टिपावेसे वाटले 
कुठलसं उडून गेलेलं मन 
अलगद पकडवसं वाटले 
म्हणून … कदाचित …
आज मला काहीतरी लिहावसं वाटलं !

कुणाचंतरी ओलं मन
पुसावसं वाटलं
कुणाचातरी असह्य त्रास
सोसावासा वाटला
कोणाचंतरी एखादं दुःख
मांडावसं वाटलं  
म्हणून … कदाचित …
आज मला काहीतरी लिहावसं वाटलं !

कुठल्याश्या दगडाच्या देवाला 
साकडं घालावासं वाटलं 
एखाद्या देवळातल्या घंटेला 
जोरात बडवावसं वाटलं 
अनोळखिश्या देवासमोर 
मनभरून रडावसं वाटलं 
म्हणून … कदाचित …
आज मला काहीतरी लिहावसं वाटलं !

पुढ्यात कागद कोरा होता
मनाची पाटी ओसंडली होती
थरथरत्या हातात एक लेखणी होती
अन स्वत:लाच कुठेतरी
मोकळं व्हावसं वाटलं
आणि …
म्हणूनच … कदाचित …
आज …. मला …. काहीतरी …. लिहावसं वाटलं !!!

- Oms
१८/०१/२०१४
१२:२५ मि.