Sunday, 16 March 2014

भाव - गीत…!!!

दाटल्या होत्या कधीच्या
भावना मनामध्ये 
सूर तो आराशापारी 
दिसला तुम्हा गाण्यामध्ये 

ॠणी असे भावनांचा 
भरल्या सदा मनातूनी
सुरांचे वस्त्र लेवूनी 
झरती अशा गीतामध्ये 

शब्द होती सारथी 
आदेश परी भावनांचा 
घेऊनि जाती गीतास 
सुरांच्या  स्वर्गामध्ये

गीत हे सेवेस तुमच्या 
भक्ती परी ती भावनांची 
भेट तुमच्या भावनांशी 
होतसे या सुरांमध्ये

दाद दिलेली गीतास
मनासी सांगते खरे 
भावना माझ्या मनीच्या 
तुमच्याही मनामध्ये… 

- Oms 
१६-०३-२०१४
१४:४२ मि. 


 

Friday, 14 March 2014

इच्छा - मरणं…!!!

मरण्यासाठी जगण्याचा अट्टाहास केला खरा
पण म्रुत्युपरिस जगण्याचाच सहवास जास्त मिळाला
जगता जगता मरणासाठी तपं केली अनेकवार
अन हाती अंती जगण्याचाच शाप उरला वारंवार

खरच कंटाळा आलाय या निर्थक जगण्याचा
रोज मन मारून जगताना मरणाचा ध्यास धरण्याचा
मरण मात्र मृगजळापरी हुलकावणीच देतं नुसतं 
जगणं आशेने कल्पनेमागे तरी धावत असतं

मरणाच्या खेळामध्ये जगणंच नेहमी का जिंकतं  ?
नको असलं तरी असलं दान ओटीत का पडतं ?
तेव्हाच का नशिबाने झोळी माझी फाटत नाही ?
अन का जीवनाच्या ठीगाळांमधून जगणं खाली सांडत नाही ?

जगणं-मरणं, हा देव सदा आपल्याहाती राखतो
त्याची मर्जी, त्याला हवं तसाच खेळ चालतो
इथे इच्छा असून जगण्याची काहींना जगता येत नाही
अन मी मरण मागूनसुद्धा माझं जगणं काही सुटत नाही … !!!

- Oms
१५-०३-२०१४
००:१६ मि.
 

Monday, 10 March 2014

लावणी…!!!

कुनी सजविला ह्यो रंगम्हाल….   
कधी झाल्ये म्या बावरी…. 
रात रात जागत्ये मी…. 
याद काढूनि जुनी…. 
तुम्ही कट्यार बा
मी जनू म्यान देखनी ….  ।।धृ।।




 

माझ्या इश्क़ाचा भलताच थाट
भल्याभल्यांना दिलिया मात
तुम्ही परी ह्यो डाव जिंकिला
अखेरच्या ह्या क्षनी
तुम्ही कट्यार बा
मी जनू म्यान देखनी …. ।।१।।



दाराशी पावनं तुमी आलं
माझ्या पायी वाजती चाळं
डावी पापनी मिटमिट करिती
धडधड वाढे उरी
तुम्ही कट्यार बा
मी जनू म्यान देखनी ….।।२।। 

इश्क़ाचं बाई हे जहर
त्यानं उरात केला कहर
तुम्हीच औषिध या जहराच 
जालीम अन जबरी
तुम्ही कट्यार बा
मी जनू म्यान देखनी …. ।।३।।

माझ्या प्रीतीचा ह्यो बाजार 
इथं दिलाचा सौदा चालं
इश्क़ाच्या ह्या दरबाराचं
तुम्हीच अन हो धनी
तुम्ही कट्यार बा
मी जनू म्यान देखनी ….।।४।।

- Oms 
११-०३-२०१४
००:५० मि.