Saturday, 14 September 2013

|| श्रीगणेश नामावली ||

भालचंद्रा शूलपाणी विधात्या सर्वेश्वरा
महाकाय तू लाभेशा प्रबुद्धा सुखदेश्वरा ।।१।।

विघ्नकर्ता विघ्नहर्ता विघ्नेशा विघ्ननाशका
सुखेशा सर्वसौख्येशा सुखकर्ता सुखदायका।।२।।

सुरेशा तू सूरस्वामी सुरपुज्या सुरनायका
चिंतामणी तू आद्येशा गौरीसुता गुणनायका।।३।।

मोरेश्वरा गणनायका गजवक्त्रा गजानना
वक्रतुंडा हे सिद्धेशा एकदंता मुषकासना ।।४।।

धूम्रवर्णा हे मंदारा हेरंबा श्रीगणेश्वरा
कवीशा तू जगत्स्वामी अमिता लंबोदरा ।।५।।

प्रारंभा मोरया देवा वरदेशा विनायका
रक्तगंधानुलीप्तांगा कपिला महानायका ।।६।।

- Oms
१५/०९/२०१३
०१:१५ मि.

Friday, 13 September 2013

कधीतरी माझ्या मनी तू .............

कधीतरी माझ्या मनी तू , सांज होऊन ये
कधी हलकेच अंतरीची , तार छेडून ये ……।।धृ।।

मी असा वेडापिसा , होऊन वाट पाहतो
चाहूल तुझ्या असण्याची , मजसाठी घेऊन ये …. ।।१।।

शिशिरात पाने सारी , या गोड धुक्यातच न्हाली
दवबिंदू  हे प्रीतीचे , पहाटे पांघरून ये …. ।।२।।

आठवांना मी तुझ्या , स्वप्नात माझ्या गुंफतो
सुखाचा जणू एक मुग्ध , स्पर्श होऊन ये …. ।।३।।

सूर ना मज सापडे , अश्रूही बघ आटले
पोळणाऱ्या जीवनी तू , सावली होऊन ये …. ।।४।।

- Oms
१४/०९/२०१३
०१:५४ मि .

Sunday, 8 September 2013

नमस्कार............ !!!!!!! (श्लोक).......

गजानना बा रे स्वामी दयाळा
तुझ्या आगमने घर होई देव्हारा
तुझ्या दर्शने तृप्ती लाभे मनासी
नमस्कार माझा श्री विनायकासी ।।१।।

असावे सदा सुख आनंद सौख्य
नसावे कदा दैन्य दारिद्र्य दु:ख
देणे करावे अशा आशिषासी
नमस्कार माझा श्री विघ्नेश्वरासी ।।२।।

तू सुखकर्ता तू विघ्नांचा हर्ता
तू माय पिता तू पालनकर्ता
चुका माझिया उदरी घालून घेसी
नमस्कार माझा श्री लंबोदरासी ।।३।।

हे शूर्पकर्णा हे एकदंता
हे गजवक्त्रा हे शंकरसुता
सदा आम्हा भक्तांच्या पाठीशी राहसी
नमस्कार माझा श्री चिंतामणीसी ।।४।।

आता न फार मज बोलावीते
कर दोन्ही जोडूनी मन प्रार्थिते
सेवा सदा तुझी करवुनी घेसी
नमस्कार माझा श्री गणनायकासी ।।५।।

 - OMS
९/९/२०१३
०२:३८ मि .