काल बोलता बोलतापटकन तोंडून sorry निघालं
अन मग विचार आला
मी का असं केलं
तेवढ्यात समोरून
कुणीतरी म्हणून गेलं…
म्हणे, "होतं रे,
जो चुकतो तोच माणूस…"
एक फुल तोडलं
अन त्याचं उरलं आयुष्य
त्या देवाच्या पायी वाहिलं
त्या देठातला ओलावा पाहून
चूकच झाली असं वाटलं
इतक्यात मनात काहीसं कुजबुजलं
म्हणे, " होतं रे,
जो चुकतो तोच माणूस…"
खिडकीत काचेवर पावसाने
सुंदर नक्षी रेखाटली होती आत वाफेने तिला
मखमली background दिली होती
मी मात्र दोन्ही नकळत पुसून टाकलं
काही क्षणांचीच त्यांची यात्रा
पण मी लवकर संपवून टाकलं
मनात काहीसं चुकल्यागत वाटलं
इतक्यात झरणारी सर सांगून गेली
म्हणे, " होतं रे,
जो चुकतो तोच माणूस…"
मला अजून कळला नाही
"चूक-बरोबर" यांच कोडं
अजून तरी सुटलं नाही
चुकीला शिक्षा असते
म्हणूनच का माणूस भोग भोगतो???
नशीब नावाच्या बहुरुप्याचा
यात काहीच का हो हात नसतो???
या प्रश्नांचं कोणाकडेच
"बरोबर" उत्तर नसतं
डोळ्यात मात्र चुकांचं मळभ दाटून येतं
इतक्यात त्या साचलेल्या चुका
नकळत सांगून जातात
म्हणे, " होतं रे,
जो चुकतो…. तोच माणूस…"
- Oms
२१-०२-२०१५
०१:२५ मि.
