Friday, 20 February 2015

जो चुकतो तोच माणूस…!!!

काल बोलता बोलता
पटकन तोंडून sorry निघालं
अन मग विचार आला
मी का असं केलं
तेवढ्यात समोरून
कुणीतरी म्हणून गेलं…
म्हणे, "होतं रे,
जो चुकतो तोच माणूस…"




अलीकडेच मी बागेत 
एक फुल तोडलं 
अन त्याचं उरलं आयुष्य 
त्या देवाच्या पायी वाहिलं 
त्या देठातला ओलावा पाहून 
चूकच झाली असं वाटलं 
इतक्यात मनात काहीसं कुजबुजलं 
म्हणे, " होतं रे,
जो चुकतो तोच माणूस…"




खिडकीत काचेवर पावसाने
सुंदर नक्षी रेखाटली होती
आत वाफेने तिला
मखमली background दिली होती
मी मात्र दोन्ही नकळत पुसून टाकलं
काही क्षणांचीच त्यांची यात्रा
पण मी लवकर संपवून टाकलं 
मनात काहीसं चुकल्यागत वाटलं
इतक्यात झरणारी सर सांगून गेली
म्हणे, " होतं रे,
जो चुकतो तोच माणूस…"

"चूक" या शब्दाचा अर्थ 
मला अजून कळला नाही 
"चूक-बरोबर" यांच कोडं 
अजून तरी सुटलं नाही 
चुकीला शिक्षा असते 
म्हणूनच का माणूस भोग भोगतो???
नशीब नावाच्या बहुरुप्याचा 
यात काहीच का हो हात नसतो???
या प्रश्नांचं कोणाकडेच 
"बरोबर" उत्तर नसतं 
डोळ्यात मात्र चुकांचं मळभ दाटून येतं
इतक्यात त्या साचलेल्या चुका 
नकळत सांगून जातात 
म्हणे, " होतं रे,
जो चुकतो…. तोच माणूस…"



- Oms 
२१-०२-२०१५
०१:२५ मि.

Saturday, 10 January 2015

येणं-जाणं...!!!

येणं जाणं काय होतच राहतं
अंगणात पावलांचं कोंडाळं होतं
कुठला ठसा कुणाचा
हा हिशोबच नसतो
भावनांचं विणलेलं कोडं मात्र
आपसूक हरक्षणी सुटतं जातं
येणं जाणं काय….

येणं असावं लाटांसारखं 
मऊ मुलायम अस्तारासारखं 
आल्यावाटे परतूनही 
पुन्हा होणाऱ्या भासांसारखं
प्रत्येक वेळी सारखंच 
तरीही हवहवसं वाटणारं 
काहीही न बोलता फक्त 
स्पर्शामधून दाटणारं 
यजमानाचं मन म्हणे 
असाच पाहुणा शोधत असतं 
बाकी… येणं जाणं काय…. 

येणं आलं की ओघानेच 
जाणं सुद्धा येतं 
आपण भरलेला रकाना 
रिता करणं येतं 
कुठलंही जाणं कधीच 
रिकाम्या हाती नसतं 
जाताना पावली खुणेचं 
दान सुटलेलं असतं
घेणाऱ्याने असलं दान 
कधीच मागितलेलं नसतं 
अन असं पदरी सारं घेऊन 
वाट पाहाणं उरून राहतं
तरीही … येणं जाणं काय…. 

आधीचं कोंडाळं जुनं होतं
त्यावर नवीन पावलांचं कोडं पडतं
भावनांना त्यात गुंफलेलं असतं
अन मन मात्र परत ठश्यांच्या
हिशोबास लागतं
हे …. येणं जाणं काय होतच राहतं….

- Oms
११-०१-२०१५
००:३३ मि.


Sunday, 21 December 2014

चंद्रोबांच मनोगत…

मला वाटतं कधीतरी
चंद्र म्हणेल असं…
"अरे थांबा लेकहो
किती काढाल माझी पिसं???…"

"कुणी म्हणे मी त्याला
वाटे त्याची प्रेयसी
कुणाला मी वाटे
तिच्या बापाच्या टकलासराशी
सुचली रात्र की आला चंद्र
हे समीकरणच झालाय जसं
अरे थांबा लेकहो
किती काढाल माझी पिसं???…"

"विनोदाचा भाग म्हणून
देतात माझी उपमा
लहान मुलांसाठी माझा
उगाचच करती मामा
ना नातं माझं कुणाशी
ना कुणी माझ्यावाणी दिसं
अरे थांबा लेकहो
किती काढाल माझी पिसं???"

"कुणासाठी त्यांच्या प्रेमाचा 
साक्षीदार झालोय मी
ढगांनी जावं आडवं तरी
म्हणे लपून बसलोय मी
चूक नाही तरीही
माझा उद्धार रात्रंदिसं
अरे थांबा लेकहो
किती काढाल माझी पिसं???…"

"मी आपला मुकाट
इतरांना हवा तसा असतो
कधी तळ्यात, कधी रानात
कधी पावसात सुद्धा भिजतो
गायब होतो म्हणूनच मी
मला होतं सर्दी-पडसं
अरे थांबा लेकहो
किती काढाल माझी पिसं???…"

"मोकळ्या हातांनी माझ्या
हे चांदणं मी वाटतोय
आजही मी रोज असाच
कलेकलेने जगतोय
तरीही कवीच्या डोकी
बरेचदा
माझंच नाव कसं??
अरे थांबा लेकहो
किती काढाल माझी पिसं???…"



- Oms
२१-१२-२०१४
२३:५९ मि.








Monday, 13 October 2014

" सांभाळ तू…!!! " ( प्रार्थना )

" यत्र तू, सर्वत्र तू
आधार अन, जाणीव तू
कर्ता-करविता, तू जगाचा
हे प्रभो, सांभाळ तू…"।।धृ।।

"ज्येष्ठ तू, सर्वेष्ट तू
कष्ट अन, निर्धार तू
कर्मात रमल्या, माणसांना
दे, यशाचा हात तू…"।।१।।

"आचार तू, विचार तू
दगडातूनी, साकार तू
निर्विकारातूनही तू
घे, मनांचा ठाव तू…"।।२।।

"स्पर्श तू, नाद तू
वाऱ्यासवे, निनाद तू
दोन मिटल्या, पापण्यांच्या
आसवांतून, दाट तू…"।।३।।

"दारुण्य तू, कारुण्य तू
अर्थात अन, व्यर्थात तू
दावूनी रस्ता, खऱ्याचा
दे, असत्या मात तू…"।।४।।

"जन्म तू, मरण तू
मम श्वास अन, विश्वास तू
अमूर्त या, जगण्यास माझ्या
दे, नवा आकार तू…"।।५।।

- Oms
१४-१०-२०१४
०१:३२ मि.  








 

Saturday, 4 October 2014

* * * तू माझ्या अंतरी * * *

हैं रात ये गुलाबी
तू अशी शराबी
हार्ट में खराबी होतसे….
धडधडे दिलाचे
क्लॉक हे अवेळी
शिरशिरी देहास येतसे….
मेनका की तू परी
असे तरी तू माझ्या अंतरी….।।१।।





वाजते कमाल 
बेल ही दिलाची
इन माईंड समथिंग होतसे….
ब्रेन ही जरासा
भान हरवल्यासा
थिंकिंग विसरतो थोडेसे….
डार्लिंग या तू कामिनी
फिरभी हैं तू माझ्या अंतरी….।।२।। 



बर्ड या मनाचे
हे ट्वीटींग करती
फेस आपका ये जब दिसे….
गुल के जैसे ये दिल
मेहेका रहा हैं हर दिल
क्रेझी केलं दिलको जबसे….
अप्सरा या जलपरी
तरीही तूच माझ्या अंतरी….।।३।।
  






हा अंधेरा मधाळ
अन काळीज बेहाल
जवळ जब तू माझ्या येतसे….
माईंड वेडंपिसं
वॉन्टींग वन कीस
रिक्वेस्ट हीच ओन्ली करतसे….
ड्रिम-गर्ल या मोहिनी
हैं तूही तू माझ्या अंतरी….।।४।। 

- Oms
०५-१०-२०१४
०१:४० मि.

Monday, 15 September 2014

नशीब नावाचं पुस्तक…!!!

सहज विकत घेता येणार नाही 
असं एक पुस्तक 
तो देऊनच पाठवतो… 
त्यातले नायक आपण 
अन कथाकार तो असतो… 

छापणाऱ्याची विरामचिन्हे 
हा आपल्या 
काळजीचा विषय असतो… 
कारण त्याच्या चुकीच्या पुज्यामुळे 
आपला विषय 
संपणार असतो… 

बरं… हे पुस्तक काही 
सगळंच छापून 
तो देत नसतो…
पुढल्या उरलेल्या 
कोऱ्या कागदांचा 
तो हुकुमी पत्ता 
राखून असतो…  

काही जुनी कहाणी वाचावी 
म्हणून तोच कधी 
मागची पाने चाळत असतो 
आपण मात्र 
नायक म्हणून 
मुकाट अतितात झुरत असतो… 

कधी तोच काही पाने 
सर्र्कन वाऱ्याने 
पालटत असतो 
वाचनासाठीची 
दुमडली पाने 
तशीच खुणेसह विसरत असतो… 

त्याचं पुस्तक
लिहून होतं
शेवट बऱ्याच टिंबांचा असतो
ह्याचा अर्थ हे कथानक 
त्याच्या हिशेबांनुसार 
पुन्हा रचणार असतो…

सहज विकत घेता येणार नाही 
असं एक पुस्तक 
तो देऊनच पाठवतो… !!!

- Oms 
१६-०९-२०१४
००:१६ मि.